गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

कर्जमाफीतील ‘५० हजारांची अट’ रद्द; आता २ लाखांपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई, दि. १० : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करण्यात आली असून, आता अशा पात्र शेतकऱ्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी देण्याचा आणि त्यांना सावकारांच्या कर्जापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. सरकारने निवडणुकीत दिलेला शब्द पाळत शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. तसेच, २ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

यापूर्वी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांची अट होती. ती आता पूर्णपणे हटविण्यात आली असून, या शेतकऱ्यांनाही थेट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.

याशिवाय, २०२६-२७ मध्ये कर्जफेड केलेली असण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. आता मागील तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षे नियमित कर्जफेड केलेले शेतकरीही या योजनेस पात्र ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, कर्जमाफीचा लाभ अधिक व्यापकपणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.