ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये ३३.५६ टक्के घट; तरीही एकूण अपघात वाढल्याने जिल्हाधिकारी गंभीर*

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत आढावा; रस्तेदुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश

गडचिरोली, ३० सप्टेंबर :

गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येत घट झाली असली, तरी अपघातांची वाढती एकूण संख्या आणि दुचाकीस्वारांचे होणारे मृत्यू लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी रस्ते अपघातांची आकडेवारी, रस्तेदुरुस्ती, प्रलंबित कामे आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अपघातांची आकडेवारी: एकूण अपघात वाढले, मृत्यू घटले
बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत १७७ अपघातांत १४६ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२६ मध्ये याच कालावधीत एकूण २१० अपघात झाले असून ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंच्या संख्येत ३३.५६ टक्के घट झाली असली, तरी एकूण अपघातांचा आलेख वाढल्याने अधिक दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. मृत पावेलेल्यांमध्ये सर्वाधिक ५९ दुचाकीस्वारांचा समावेश असून, हेल्मेटचा वापर न करणे, अतिवेग आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर अधिक प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रस्तेदुरुस्तीला प्राधान्य; हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
जिल्ह्यातील मुख्य दळणवळण मार्गांवर अपघात रोखण्यासाठी रस्तेदुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये:

* गडचिरोली-आरमोरी, चामोर्शी, धानोरा तसेच आष्टी-आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील खड्डे बुजवून दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले.
* रस्त्यांची वेळेवर देखभाल न करणाऱ्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे तसेच आवश्यकतेनुसार त्यांना काळ्या यादीत (Blacklist) टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होणार
शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी नगरपरिषद व पोलीस विभागाने संयुक्तपणे खालील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले:

* इंदिरा गांधी चौकाची पुनर्रचना: शहरातील मुख्य केंद्र असलेल्या इंदिरा गांधी चौकाचे रिडिझाईन करण्यात येणार आहे.
* अतिक्रमण मोहीम: आठवडी बाजार परिसरातील सर्व प्रकारची वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवण्यात येतील.
* सिग्नल आणि सीसीटीव्ही: वाहतूक सिग्नल, गतिरोधक, सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे, रुग्णवाहिका आणि वेग नियंत्रक (Speed Governors) उपकरणांसाठीच्या प्रस्तावांना गती दिली जाईल. तसेच बसगाड्यांचे अनधिकृत थांबे रोखून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईवर भर देण्यात येईल.

G K