मुख्य रस्ते, चौक आणि मंदिर परिसरात अंधाराचे साम्राज्य; भाविक, महिला व ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सिरोंचा:
आगामी पावन नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सिरोंचा शहरातील बंद आणि नादुरुस्त असलेले सर्व पथदिवे (Street Lights) तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी धर्मराव विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सणासुदीच्या काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सार्वजनिक ठिकाणची प्रकाश व्यवस्था सुधारणे अत्यंत आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
सध्या सिरोंचा शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख चौक, गजबजलेली बाजारपेठ आणि विविध मंदिर परिसरात अनेक पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
महिला व बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न:
नवरात्रोत्सवामध्ये रात्रीच्या वेळी मंदिरात दर्शनासाठी आणि गरबा-दांडिया कार्यक्रमांसाठी महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत रस्त्यांवर अंधार असल्यामुळे चोरी, अपघात किंवा छेडछाडीसारख्या अनुचित घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने कोणताही विलंब न लावता युद्धपातळीवर नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करावी, जेणेकरून नवरात्रोत्सव सुरक्षित वातावरणात साजरा करता येईल, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.





