
*नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
गडचिरोली, दि. १६ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील महिला स्वयं-सहाय्यता गट यांना कृषी प्रक्रिया उद्योग व गोदाम उभारणीसाठी शासनामार्फत प्रकल्प मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पात्र संस्थांनी विहित कालावधीत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कृषी उत्पादनाला अधिक मूल्यवर्धन मिळावे, शेतीमालाचे वैज्ञानिक साठवणुकीचे जाळे उभे राहावे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांची आर्थिक क्षमता वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीलाही मोठी गती मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया युनिट उभारणी, गोदाम बांधकाम, कृषी मूल्यवर्धन व पॅकेजिंग सुविधा, शेतीमालाचे वैज्ञानिक साठवण व गुणवत्तावाढ तसेच बाजारपेठेशी थेट जोडणीसाठी आवश्यक सुविधा उभारण्यास आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यामुळे शेतमालावर स्थानिक स्तरावर प्रक्रिया करून अधिक मूल्य प्राप्त होईल, काढणीनंतर होणारे नुकसान कमी होईल आणि कृषी आधारित उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पुरस्कृत महिला स्वयं-सहाय्यता गट, ग्रामसंघ, ग्रामपंचायती तसेच प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार आणि विहित मुदतीत प्रस्ताव सादर करणाऱ्या पात्र संस्थांना या योजनेचा लाभ मिळणार असून, अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी विभाग, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली यांनी कळविले आहे.





