मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे कक्ष पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार येणार आहे.
गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा तसेच अर्ज आणि पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण किंवा नातेवाईकांना मंत्रालयात जावे लागू नये, या दृष्टीने या कक्षाची रचना करण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता आणि 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या कक्षांच्या प्रभावी कार्यान्वयनासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले.
या कक्षामार्फत रुग्ण व नातेवाईकांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची सद्यस्थिती, मदतीसाठी पात्र असलेल्या आजारांची माहिती तसेच संलग्न रुग्णालयांची यादी मिळणार आहे. त्यामुळे अर्जदारांना वेळ व पैसे वाचतील आणि मदत तत्काळ पोहोचेल. याशिवाय कक्षातर्फे जनजागृती, रुग्णालयातील भेटी, गरजूंना मदत, आपत्तीच्या ठिकाणी उपस्थिती आणि निधीसाठी देणग्या वाढवण्याचे प्रयत्नही करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळणार असून आरोग्य सहाय्यासाठी अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचेप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.