Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

हरित क्रांतीचे जनक दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

हरित क्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचे लोकार्पण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक येथे झालेल्या या लोकार्पण सोहळ्यास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा  (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुसिंग महाराज राठोड, आमदार बाबुराव कदम, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर श्री. शाह यांनी कळ दाबुन पुतळ्याचे व नामफलकाचे अनावरण केले. याप्रसंगी बंजारा समाजाच्यावतीने श्री. शाह व श्री. फडणवीस यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक उपस्थित होते.

हरितक्रांतीचे जनक दिवंगत वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड – वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक परिसरात उभारला आहे. नऊ फूट उंचीच्या या पुतळ्याचे वजन सुमारे 700 किलो आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी रुपये 13 लक्ष 99 हजार एवढा खर्च आला आहे. 232.60 चौ.मी. जागेत या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे. सुशोभिकरणाची अंदाजे 69 लाख रुपयांची कामे आहेत.