गडचिरोली, दि. ६ ऑक्टोबर (जिमाका) : नवरात्रोत्सव, शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३८ (१) अन्वये हे आदेश जारी केले असून, ते ११ ऑक्टोबर २०२६ पासून ते २३ ऑक्टोबर २०२६ रोजीपर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत लागू राहतील.
आदेशानुसार डीजे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट, वूफर व सब-वूफर यांसारख्या अतितीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरास बंदी राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा त्याच्या परिसरात ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर, ॲम्प्लिफायर व इतर ध्वनी उपकरणांच्या वापरासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी आवश्यक आहे. परवानगी मिळाल्यानंतरही निर्धारित ध्वनीमर्यादा व अटींचे पालन बंधनकारक राहील.
रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनी उपकरणांच्या वापरास सक्त मनाई राहील. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी विहित केलेले दिवस व वेळ यांना आदेशानुसार अपवाद राहणार आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल अशी ध्वनीमर्यादा राहील.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी व रुग्णांना त्रास होणार नाही आणि सार्वजनिक शांतता भंग होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये व अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या परिसरात लागू निर्बंधांचे काटेकोर पालन करावे.
ध्वनिप्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा नियमभंग निदर्शनास आल्यास पोलीस तात्काळ पाहणी करून कायदेशीर कारवाई करतील. उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३६ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल. वारंवार उल्लंघन झाल्यास परवानगी रद्द करणे तसेच कलम ७० अन्वये ध्वनीक्षेपकाचे साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.





