शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! रोहिती कामांसाठी लागणारी माती, गाळ व मुरूम आता रॉयल्टीमुक्त; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐतिहासिक घोषणा
मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि शेती विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहिती (शेतीसाठी आवश्यक) कामांसाठी लागणारी माती, गाळ व मुरूम यावरील रॉयल्टी पूर्णपणे माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार असून शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे अधिक सोपे होणार आहे.
या निर्णयानुसार विहीर, शेततळे, गोठा, शेतरस्ते तसेच इतर शेतीपूरक कामांसाठी लागणारे गौण खनिज आता मोफत उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी होऊन कृषी विकासाला गती मिळणार आहे.
यासोबतच शासनाने परवानगी प्रक्रियाही सुलभ केली आहे. साध्या अर्जावर १५ दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात आले असून, शेतकऱ्यांची विनाकारण अडवणूक करणाऱ्या किंवा परवानगी प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जलसंधारण, सिंचन सुविधा, शेतीचे आधुनिकीकरण आणि पशुपालनासाठी आवश्यक सुविधा उभारण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महसूल विभागाने शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. शासनाचा हा निर्णय राज्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून शेतकऱ्यांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.





