तक्रारदार महिला राज्य परिवहन महामंडळाच्या रंकाळा बसस्थानकावर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनुसार, भानुदास मदने हे वारंवार वैयक्तिक कारणांसाठी संपर्क साधत होते. आपण भेटायला का येत नाही, अशी विचारणा करून बाहेर भेटण्याचा आग्रह केला जात असल्याचा आरोप महिलेने केला आहे. संबंधित व्यक्ती नेमक्या कोणत्या पदावर कार्यरत आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
दारू पार्टीची व्यवस्था करण्यासाठी दबाव
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये भानुदास मदने यांनी एका कर्मचाऱ्यामार्फत संध्याकाळी दारू पार्टीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मात्र, तक्रारदार महिलेने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतरही मदने हे वैयक्तिक बोलण्यासाठी फोन करत होते आणि बाहेर भेटण्यास सांगत होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
‘तू सांगूनसुद्धा मला भेटायला येत नाहीस, तू माझ्या जवळ असायला पाहिजेस; म्हणून मीच तुझी बदली केलेली आहे. आता कशी येत नाहीस ते बघतो,’ अशा शब्दांत संबंधित व्यक्तीने धमकावल्याचा आरोपही महिलेने केला आहे. बदलीच्या संदर्भातही आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
बदलीच्या कामासाठी गेली असताना हात पकडल्याचा आरोप
दरम्यान, 1ऑगस्ट 2026 रोजी बदलीसंदर्भातील कामासाठी तक्रारदार महिला मध्यवर्ती बसस्थानकात गेली होती. त्यावेळी भानुदास मदने यांनी पुन्हा तिच्याशी भेटण्याचा आग्रह धरला. याच प्रसंगी त्यांनी आपला हात पकडल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेमुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित व्यक्तीच्या वारंवार संपर्कामुळे, भेटण्यासाठी केलेल्या आग्रहामुळे आणि कथित गैरवर्तनामुळे आपली बदनामी होण्याची भीती निर्माण झाली असून, मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे महिलेने नमूद केले आहे. अखेर तिने भानुदास कमलाकर मदने यांच्याविरोधात पोलिसांकडे कायदेशीर तक्रार दाखल केली.
या तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षारक्षकाने केलेल्या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, संबंधित व्यक्तीची भूमिका आणि प्रकरणातील वस्तुस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात पोलीस पुढे कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.





