घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), जिल्हा प्रशासन आणि भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील प्रवाशांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना मदत पोहोचविण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाच्या (UCADA) अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्यानंतर त्याचे शेवटचे लोकेशन जोशीमठमधील चाई गावाच्या वर असलेल्या लष्करी छावणी परिसरात दिसून आले. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना त्यांनी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि SDRF संयुक्तपणे बचावकार्य करत असल्याचे सांगितले. संपूर्ण परिस्थितीवर आपण स्वतः लक्ष ठेवून असल्याचे नमूद करत गंभीर जखमींना तातडीने एअरलिफ्ट करून उच्चस्तरीय वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व प्रवासी सुरक्षित राहावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये सध्या हवामान प्रतिकूल असून अनेक भागांत पाऊस, वादळी वारे आणि धुक्याची परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने 30 ऑक्टोबरसाठी चमोलीसह नैनीताल, चंपावत, पिथौरागढ आणि बागेश्वर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला होता. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांची प्रकृती आणि अपघाताबाबतची अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.



