दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ‘पॅट-१’ चाचणी २ डिसेंबरपासून!
राज्यभरात SCERT कडून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; नाशिक शहरातील ९७ हजार ४६९ विद्यार्थी देणार परीक्षा, १५ डिसेंबरदरम्यान निकाल जाहीर होणार
मुंबई / नाशिक : राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) आयोजित करण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी (PAT-1) आता २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात नियोजित असलेली ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
तीन दिवसांत होणार विषयवार चाचणी
सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षेचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.
- २ डिसेंबर २०२६ : प्रथम भाषा
- ३ डिसेंबर २०२६ : गणित
- ५ डिसेंबर २०२६ : तृतीय भाषा
ही चाचणी दहा माध्यमांमध्ये घेण्यात येणार आहे. नाशिक शहरातील दुसरी ते आठवीच्या एकूण ९७ हजार ४६९ विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका दाखल झाल्या असून, त्यांचे शाळानिहाय वितरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचे होणार मूल्यमापन
विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम कितपत आत्मसात केला आहे, तसेच त्यांच्या अध्ययनातील उणिवा कोणत्या आहेत, हे ओळखणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमतांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
चाचणीच्या निकालाच्या आधारे अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांवर परीक्षेचा अतिरिक्त ताण नको!
SCERT ने स्पष्ट केले आहे की, ही चाचणी दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांप्रमाणे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त मानसिक ताण आणू नये, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
१५ डिसेंबरदरम्यान निकाल
पॅट-१ चाचणीचे मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर १५ डिसेंबर २०२६ दरम्यान निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन अध्यापन प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.


