विदर्भ

महिला आरक्षण आणि मतदारसंघ परिसीमन : दोन्ही विधेयकांना मंत्रिमंडळाची मंजुरी बैठकीत निर्णय; संसदेच्या विशेष अधिवेशनात होणार सादर

नवी दिल्ली, दि. २७ नोव्हेंबर २०२६ : महिला आरक्षण आणि मतदारसंघ परिसीमनाबाबतच्या घटनादुरुस्ती विधेयकाला शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संसदेच्या विशेष अधिवेशनात ही दोन्ही विधेयके मांडण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला आरक्षण लागू करताना मतदारसंघ परिसीमनाबाबतच्या घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभा तसेच राज्य विधानसभेतील जागा वाढवण्याच्या निर्णयासह मंजुरी देण्यात आली. या वाढवलेल्या जागा पुढील २५ वर्षांपर्यंत म्हणजे २०५१ पर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी सरकारने ३० नोव्हेंबरला लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्यसभेची बैठक २ डिसेंबरला होणार आहे. सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

वायएसआर काँग्रेस, द्रमुकचा सशर्त पाठिंबा

या दोन्ही घटनादुरुस्ती विधेयकांना पाठिंबा देण्याबाबत राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. २४ टक्के जागा कायम राहिल्या पाहिजेत, या मुद्द्यावर काही पक्षांनी भूमिका मांडली आहे. वायएसआर काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटनादुरुस्ती विधेयकांना सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे.

संविधान बदलण्याचा डाव : काँग्रेस

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पारित करून संविधान बदलणे केंद्र सरकारचा उद्देश आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. इंडिया आघाडीतील इतर पक्षांसोबत यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दिली.

स्टॅलिन यांनी केली भूमिका स्पष्ट

लोकसभेत तामिळनाडूतील ७.१८ टक्के जागा कायम राहिल्या पाहिजेत. या मुद्द्यावर आपला पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही, असे द्रमुकचे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. १९७१ च्या जनगणनेच्या आधारावर तामिळनाडूच्या लोकसभेत ज्या जागा आहेत, त्या पुढील २५ वर्षे कायम राहिल्या पाहिजेत, ही आमची भूमिका असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले.

सपाचा विरोध

मतदारसंघ परिसीमनाबाबतच्या घटनादुरुस्ती विधेयकाला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले की, मतदारसंघांचे परिसीमन ही भाजपाची सर्वात मोठी चूक ठरणार आहे. सपा या विधेयकाला विरोध करेल.

भारत राष्ट्र समितीचा सशर्त पाठिंबा

भारत राष्ट्र समितीने या विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. लोकसभेत सध्या दक्षिण भारतातील राज्यांच्या जागा कमी होणार नाहीत, याची हमी मिळाली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे.

आपची सावध भूमिका

मतदारसंघ परिसीमनाबाबतच्या घटनादुरुस्ती विधेयकाचा मसुदा समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही, असे आपने म्हटले आहे. या विधेयकाच्या मसुद्यात सर्व राज्यांना सारखे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद असली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, भाजपामित्रपक्षांचे हित या विधेयकातून साध्य असेल तर आमचा त्याला विरोध राहील, असे आपने स्पष्ट केले.

header