महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा मार्च – एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
१२वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट कसं कराल ऑनलाईन डाऊनलोड?
सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना मार्च – एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खालील संकेतस्थळावर बुधवार, दिनांक ०९/०२/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून उपलब्ध केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर college login मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) download करू शकता.
या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,
१. मार्च – एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ. १२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
२. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/ प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
३. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.
४. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
५. प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
तरी मार्च – एप्रिल २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.
अधिसूचना प्रेसनोट : मार्च /एप्रिल २०२२ १२वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत (hall ticket) अधिसूचना प्रेसनोट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.