मुंबई दि. 8: “समाज, देश, संस्कृती, धर्म वाचवण्यासाठी गुरू नानक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढा दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांचा इतिहास अविस्मरणीय आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.
गुरुनानक जयंतीनिमित्त मुंबई येथे आयोजित प्रकाशपूरब कार्यक्रमात ते बोलत होते. “गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त व प्रकाश पावन पर्व वर्षानिमित्ताने मला गुरू ग्रंथसाहेब यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभले. आपल्यामध्ये येऊन मला एक सकारात्मक ऊर्जा मिळते, तसेच आपल्या जीवनामध्ये चांगले काम करण्यासाठी मला प्रेरणा मिळते. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेद न करता सर्वांना या समुदायात समान वागणूक मिळते. ही शिकवण आपल्या गुरुंनी आपल्याला दिली आहे. या समुदायाकडून ही प्रेरणा घेऊन पुढे गेल्यास आपला देश, समाज प्रगती करेल, ” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
गुरु तेग बहादूर वसाहतीच्या पुनर्विकासाच्या कामास गती देण्यात देणार
“मुंबईतील गुरु तेग बहादूर कॉलनीत शीख, पंजाबी, सिंधी समाज 70 ते 75 वर्षापासून राहतो. जुनी वसाहत असल्याने याठिकाणी बऱ्याच इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. या विभागातील इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. त्याचं काम आपण लवकरच सुरू करणार असून या कामाला गती देण्यात येईल. शीख समुदायाने आतापर्यंत सहन केलेल्या त्रासातून बाहेर पडण्याची संधी या पुर्नविकासाच्या माध्यामातून मिळणार आहे”, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी खासदार मनोज कोटक,आमदार कॅप्टन.आर.तमिल सेल्वन ,मिहीर कोटेचा,सरदार तारासिंग,सरदार मनमोहनसिंग यांच्यासह शिख समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री यांना परपंरेनुसार पगडी बांधण्यात आली व गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त निमित्त गुरुग्रंथसाहेबचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.