वाशिम, दि.०४ (जिमाका) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ४ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या कारंजा टोल प्लाझा, शेलूबाजार टोल प्लाझा व मालेगाव टोल प्लाझाची पाहणी केली. तसेच शेलुबाजार ते मालेगाव दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृद्धी महामार्गावरील बेस कॅम्प येथे मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि श्री. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दोनद (खुर्द) येथून सुरू होणारा समृद्धी महामार्ग मालेगाव तालुक्यातील केनवड येथून पुढे बुलढाणा जिल्ह्यात जातो. ९७ किमीचा हा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जातो.