8 कोटींच्या निधीतून होणार वसतिगृहाचे बांधकाम
आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न
अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या देचलीपेठा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी 8 कोटी रुपयांच्या निधीतून वस्तीगृहाचे बांधकाम होणार असून निवासाची उत्तम सोय होणार आहे. नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रेमानाथ लोखंडे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज माजी बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास, कोंजेडचे सरपंच सुनीता, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोरतेट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकाश जामठे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, बाबुराव तोर्रेम,तिरूपती मडावी आदी उपस्थित होते.
देचलीपेठा येथे मागील 15 ते 20 वर्षापासून शासकीय आश्रम शाळा आहे. या ठिकाणी एक ते दहा वी पर्यंत विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेतात.अत्यंत कमी जागेत विद्यार्थ्यांनींची निवासाची सोय असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याची माहिती मिळताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी तब्बल आठ कोटी रुपयांची निधी खेचून आणली.
आदिवासी विकास विभागाकडून मिळालेल्या 8 कोटी रुपयांच्या निधीतून मुलींसाठी वस्तीगृहाच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर जवळपास 140 मुलींना या ठिकाणी स्वतंत्र निवासाची सोय होणार असल्याने शासकीय आश्रम शाळेची खूप मोठी अडचण दूर होणार आहे.
नुकतेच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते 11 मार्च रोजी वसतिगृह नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.