ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृष्ण कान्हाई यांच्या चित्रातून साक्षात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

पद्मश्री कृष्ण कान्हाई यांच्या चित्र प्रदर्शनाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

मुंबई, दि. ४ : पद्मश्री कृष्ण कान्हाई यांनी साकारलेल्या चित्रांमधून साक्षात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घडते, अशी भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. आपल्या चित्रांमध्ये सोन्याचा वापर करून त्या चित्रांना सुवर्णापेक्षा जास्त किंमत मिळवून दिली आहे. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम इस्कॉनला देणगी स्वरुपात दिली जाणार आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

वरळी येथील ताओ आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पद्मश्री कृष्ण कान्हाई यांच्या चित्र प्रदर्शनाला मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भेट दिली. यावेळी शायना एन.सी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

भगवान श्रीकृष्णावर अगाध श्रध्दा असणाऱ्या श्री. कान्हाई यांच्या २४ चित्रांचे प्रदर्शन सध्या ताओ आर्ट गॅलरी येथे सुरू आहे. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक चित्र साकारणाऱ्या पोट्रेट आणि गोल्ड पेंटिंग यामध्ये निपुण असणारे श्री. कान्हाई यांनी या चित्र प्रदर्शनात कृष्णाची विविध रूपे साकारून याला मिडास टच दिला असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

१९७६ पासून चित्रकारी करणाऱ्या श्री. कान्हाई यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे पोट्रेट (व्यक्तिचित्र) तयार केले असून गुजरात येथील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे ठेवण्यात आले आहे. याशिवाय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे पोट्रेट (व्यक्तिचित्र) नवी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आले आहे.