विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली होती
पुण्यात सोमवारी झालेला मुसळधार पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगांमुळे हा पाऊस पडला असून त्यामुळे शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला. येत्या काही दिवसात पुण्यात पाऊस कायम राहिल्यास, आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ४८ तासांच्या कालावधीत पुण्याने ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस अनुभवला आहे. २४ तासातील पावसाचा तपशील पाहता दोन्ही वेळा महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पुण्यात पडला आहे. ऑक्टोबर महिन्यातील १८ दिवसांमध्ये शहरात ३३९ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. यंदा पुण्यात ऑक्टोबर महिन्यातच सर्वाधिक पाऊस का पडला? याबाबतचे हे विश्लेषण.
