डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा
मुंबई, दि. १३:- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांना आदर्श मानून वाटचाल करत राहू. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त करू, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर आज आपला देश जगात एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे. यामुळे आपला देश आणि महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य म्हणून काम करत आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या वंचितांच्या कल्याणाचा, समानतेचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून काम करत आहोत. समाजातील सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध संस्था काम करत आहेत. या विभागाच्या योजनांकरिता भरीव निधीची तरतूद देखील केली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुशासनाचे आणि कल्याणकारी राज्याचे समाधान नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही वाटचाल करत राहू, याची ग्वाहीदेखील देतो.
