अमेरिकेतील इनग्रॅडिएन्ट कॉर्पोरेशनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, दि. 27 : “कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी अन्नप्रक्रिया उद्योगावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी अमेरिकेतील इनग्रॅडिएन्ट कॉर्पोरेशनने राज्याला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज अमेरिकेतील इनग्रॅडिएन्ट कॉर्पोरेशनच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष जीम झॅली यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आमदार जयकुमार रावल, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष विपीन शर्मा उपस्थित होते.
महाराष्ट्रात शेती क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव असून या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळामुळे उद्योगवाढीला संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मधुमेहींसाठी लाभदायी असलेल्या स्टिव्हीयाच्या लागवडीला राज्यात प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, त्यासाठी इनग्रॅडिएन्ट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील शेतकरी प्रयोगशील असून अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी या कंपनीच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळावे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.