ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी प्रमाणेच मुख्यमंत्री सचिवालयातून संनियंत्रण

तरूणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय आहे. एका तरुणाला रोजगार म्हणजे, त्याच्या कुटुंबांचा आनंद, समाधान. त्यामुळे नमो रोजगार अभियानांतर्गात होणारा नमो महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विभागांनी मेहनत घ्यावी. त्यासाठी मुख्यमंत्री सचिवालायतूनच संनियंत्रण केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

शासन आपल्या दारी प्रमाणेच नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

नमो महारोजगार अभियानांतर्गत ठाणे जिल्हयात आय़ोजित करण्यात येणाऱ्या महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचेअ अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी आदी उपस्थित होते. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झाले आहे. त्याचप्रमाणे नमो महारोजगार अभियानांतर्गत नागपूर येथील महारोजगार मेळावा यशस्वी झाला आहे. त्याचप्रमाणे आता यापुढे होणारे महारोजगार मेळावे शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन, मेहनत घेऊन यशस्वी करणे आवश्यक आहे. एका तरूणाला रोजगार मिळाला, तर त्याच्या कुटुंबांलाही मोठा दिलासा मिळतो. त्यामुळेच या महारोजगार मेळाव्यात जास्तीत कंपन्यांनी यावे यासाठी प्रयत्न व्हावेत. या मेळाव्यात सहभागी तरुणांचीही कुशल, निमकुशल अशी वर्गवारीची माहितीही उपलब्ध करून देण्यात यावी. मोठ्या कंपन्यांसोबत, आपले महानगरपालिका, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, त्यांच्या संघटना, तसेच मोठे उद्योग नोकऱ्यांचे ऑनलाईन प्लॅटफार्मस, रिक्रुटमेंट कंपन्यांही यावेत, असे नियोजन करण्यात यावे.

मंत्री श्री. लोढा यांनी देखील महारोजगार मेळावा हा महाराष्ट्र राज्याचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे तो यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले जावेत यासाठी समन्वयाने आणि एकजुटीने प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. ठाणे हा जिल्हा कोकणच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने हा मेळावा प्रचंड यशस्वी व्हावा, असे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत ठाणे येथील महारोजगार मेळाव्याच्या आयोजनाचे स्थळ निश्चिती, तसेच रस्ते, वाहतूक सुविधा अनुषांगिक बाबींबाबत आढावा घेण्यात आला.