मुंबई, दि. 16 :- शासन नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवित आहे. हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मिशन लाईफ’ला पूरक असून या माध्यमातून जागतिक पातळीवरील वातावरणीय कृती आराखड्याला समर्थन दिले जात असल्याचे राज्याच्या पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले.
इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे आयोजित कॉप – 27 जागतिक परिषदेत भारतीय पॅवेलियनमध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ या वातावरणीय कृती उपक्रमाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी श्री.दराडे बोलत होते. ‘लाईफ – लाईफस्टाईल फॉर एन्व्हायर्नमेंट’ ही अभियानाची यावर्षी संकल्पना आहे.
मागील वर्षी इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) च्या अहवालानुसार वातावरणात होत असलेले बदल ही धोक्याची सूचना आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानातून जमीन, वायू, पाणी, ऊर्जा आणि आकाश या पंचमहाभुतांवर लक्ष केंद्रित करून त्यात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक आणि आर्थिक केंद्र आहे. राज्यात पर्यावरणास अनुकूल विविधतेने नटलेले निसर्गसौंदर्य उपलब्ध आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्यात वातावरणीय बदलास स्वीकारून त्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावला जात असल्याचे श्री.दराडे यांनी यावेळी सांगितले.
