राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नायब तहसिलदार निखील पाटील यांचाही गौरव
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2024-25 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना राज्यस्तरावर पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना ग्रामसभा सक्षमीकरण उपक्रमासाठी विभाग स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाने लोकसहभागातून सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे सक्षमीकरण या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागातील ग्रामसभांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. हा पुरस्कार विभागीय स्तरांवरील निवड समितीमार्फत निवडलेल्या प्रस्तावांच्या श्रेणीत देण्यात आला असून, त्याचे स्वरूप रु. ४ लाख रोख आहे.
या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार निखील पाटील यांनाही त्यांच्या ‘एकच ॲप – सर्व सेवा’ या अभिनव उपक्रमासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरिकांना तहसिल कार्यालयाच्या विविध सेवा एकाच मोबाइल ॲपच्या माध्यमातून सुलभपणे उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमासाठी त्यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या गटातील ‘सर्वोत्तम कल्पना व उपक्रम’ श्रेणीत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून त्याचे स्वरूप रु. ३०,००० रोख आहे.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा राबविण्यात आल्या. या कार्यक्रमात विजेत्या ठरलेल्या सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
