ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी

मुंबई, दि. २५ : पावसामुळे सांताक्रुझ परिसरातील मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मिलन सबवे या भागात पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. यावर्षी  पाण्याचा निचरा करण्यासाठी हजारो लिटर क्षमतेचे वॉटर टॅंक कार्यान्वित करण्यात आले आहेत. सकल भागातील पाणी पंपिंगद्वारे उचलून साठवण टाक्यांमध्ये टाकले जात आहे. त्यामुळे येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. याच धर्तीवर मुंबईतील इतर सखल भागातही अशी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रुममधील यंत्रणा मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पाणी साचण्याची कारणे जाणून घेतानाच या भागात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.