नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : आपल्या असाधारण कर्तृत्वाने भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात देवत्व मिळाले, हेच कर्तृत्व अन् देवत्व प्रत्येक आदिवासी बांधवाच्या वाट्याला येण्यासाठी प्रत्येक आदिवासी बांधवाने बिरसा मुंडा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
येथील गोल्फ क्लब मैदानावर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सावाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य सुरू आहे. आदिवासी बांधवांसाठी केवळ योजना, कार्यक्रम न घेता त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्याने आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती संपूर्ण देशात जनजातीय दिवस म्हणून साजरी केली जाते. एवढ्यावरच न थांबता देशात सर्वोच्च राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांची निवड करून आदिवासी बांधवांचा यथोचित सन्मानही केला आहे.
देशाच्या प्रत्येक आदिवासी बांधवांच्या उत्थान आणि सन्मानासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून त्यांच्या समस्या सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
राज्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून वैयक्तिक स्वरूपाचे व सामुहिक स्वरूपाचे दावे मंजूर करून राज्याने आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठीचा एक नवा आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे. कातकरी समाजाच्या घरकुलांसाठी राज्य शासनाने गावठाण जमिनी देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना हक्काचे घरकूल मिळणार आहे. आदिवासींची शिष्यवृत्ती डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर कशी जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याबरोबरच आदिवासी बांधवांची संस्कृती टिकवण्यासाठी, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.
राज्यात अनुसूचित जनजाती आयोग स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जल, जमीन आणि जंगलासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी लढा दिला असून देशातील सर्व आदिवासी क्रांतिकारकांचे कार्य हे प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. आदिवासी क्रांतिकारकांचा लढा हा देशाला स्वातंत्र्यापर्यंत घेवून गेला. आदिवासी बांधवांच्या कला, संस्कृती आणि परंपरेचे प्रतिबिंब असलेला हा महोत्सव अभिनव असा आहे. आदिवासी बांधवांसाठी विकासाच्या संकल्पनांसोबत त्यांच्या हस्तकौशल्याचे ब्रॅंडिंग व मार्केटींग करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न शासनामार्फत केले जातील. त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या मागणीनुसार राज्यात लवकरच अनुसूचित जनजाती आयोगाची स्थापना करणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.
नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनजातीय क्रांतीकारकांची माहिती संकलित व्हावी – डॉ.भारती पवार
यावेळी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनजातीय गौरव दिवस आज साजरा होत आहे. या दिवसाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या विकासाला दिशा मिळण्यास मदत होणार आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बिरसा मुंडा, महिलांमध्ये राणी झनकारीबाई यांच्यासारख्या अनेक जनजातीय क्रांतिकारकांसह महिलांनीही सहभाग घेतला होता. समाजाची प्रगती करण्यासाठी इतिहासातून प्रेरणा मिळत असते. त्यासाठी सर्व जनजातीय क्रांतिकारकांच्या शौर्याची नोंद होणे गरजेचे असल्याने आजच्या नव तंत्रज्ञानाच्या युगात सर्व जनजातीय क्रांतिकारकांची माहिती संकलित करून ती येणाऱ्या पिढीला माहिती होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
वनहक्कासाठी मंत्रालयात वेगळा कक्ष स्थापन करणार – डॉ.विजयकुमार गावित
यावेळी बोलतांना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, आदिवासी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाच्या सन्मानार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून मागील वर्षीपासून 15 नोव्हेंबर हा दिवस देशात जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत असून वनपट्टे, वनहक्के दाव्यांबाबत कायद्याच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम सुरू झाले आहे व यासाठी मंत्रालयात वेगळा कक्ष स्थापन करण्यात येईल. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावे, वाड्या व वस्त्या यांची कनेक्टीव्हीटी वाढविणे गरजेचे आहे. यासाठी या भागात रस्ते, वीज, इंटरनेट या मुलभूत सुविधा विकसित करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून सुरू आहेत.
आदिवासी विकासाच्या योजना तळागाळात पोहोचवणार – दादाजी भुसे
आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजना असून या योजना तळागाळातल्या आदिवासी बांधवांपर्यंत अशा प्रकारच्या सांस्कृतिक महोत्सवातून पोहचवण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. नाशिक हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील वाड्या-पाड्यातील शेवटच्या आदिवासी बांधवाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही बंदरे, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.
आदिवासी क्लस्टरच्या माध्यमातून कौशल्याला मिळणार न्याय – नरहरी झिरवाळ
आदिवासी बांधवांच्या कौशल्याला न्याय देण्यासाठी जिल्ह्यात मडकीजांब येथे नियोजित आदिवासी क्लस्टर उभारले गेल्यास या क्लस्टरच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, कास्ट औषधे व छोटे उद्योग यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आदिवासी जनजाती गौरव दिनानिमित्त येथील प्रदर्शनात आदिवासी बांधवांचे विविध प्रकारची दालने आहेत. आदिवासी उत्पादक व्यावसायिक मार्गदर्शनातून निश्चितच विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू विकण्याचे कौशल्य आत्मसात करू शकतात. यादृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या ‘ग्रामसारथी’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन तसेच ‘आदि स्वयंम’ या ऑनलाइन पोर्टलचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध कला, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या युवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.