प्रशिक्षण व मूल्यमापन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या पात्र प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत बुडालेल्या रोजंदारी/वेतनाची भरपाई म्हणून कमाल रुपये ४,२००/- मिळणार
मुंबई, दि. ___ : केंद्र शासनाचे पत्र दि. २५.०९.२०१८ मधील मॉडेल वेलफेअर स्किम अंमलबजावणी निर्देश, निती आयोगाचे पत्र क्र. M-१३०१५/१२/२०१९ SDE/ERS दि. ०४.०८.२०१९ तसेच केंद्र शासनाचे दि. २१.०६.२०१९ रोजीचे मार्गदर्शक तत्वे यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षाकरिता नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांसाठी कौशल्य विकास वृद्धीकरण (Recognition of Prior Learning – RPL) कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत मंडळाच्या नोंदीतील एकूण २,१९,८०६ सक्रिय बांधकाम कामगारांना १२० तासांचे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षणानंतर मूल्यमापनाची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ (MSBSVET) या शासकीय संस्थेमार्फत पार पाडण्यात येत आहे.
प्रशिक्षण व मूल्यमापन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या पात्र प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत बुडालेल्या रोजंदारी/वेतनाची भरपाई म्हणून कमाल रुपये ४,२००/- (रु. ३५ प्रति तास प्रमाणे) इतकी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने अदा करण्यात येणार आहे.
सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांची किमान ८० टक्के उपस्थिती तसेच मूल्यमापनामध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक राहतील. अशा प्रशिक्षणार्थ्यांना RPL चे तात्पुरते अथवा अंतिम प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
वेतन भरपाई लाभासाठी मंडळाच्या IWBMS संगणकीय प्रणालीमध्ये ‘समाज कल्याण योजना’ अंतर्गत ‘S-०७ (नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कौशल्य विकास योजना – RPL)’ हा ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पात्र लाभार्थ्यांनी https://mahabocw.in या संकेतस्थळावर जाऊन ‘Apply for Claim’ अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जासोबत RPL प्रमाणपत्र व बँक पासबुक अपलोड करणे बंधनकारक आहे.
ज्या बांधकाम कामगारांचे बँक तपशील मंडळाकडे उपलब्ध नसतील त्यांनी अर्ज करताना स्वतःचे अचूक बँक तपशील नमूद करावेत. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित कामगार सुविधा केंद्रामार्फत कागदपत्र पडताळणीची कार्यवाही करण्यात येईल.
तरी सर्व पात्र प्रशिक्षणार्थींनी निर्धारित प्रक्रियेनुसार ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात येत आहे.




