शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर बोलताना राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांच्या टीकेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी या प्रकरणात त्यांचं ज्ञान पाजळू नये, असे त्या म्हणाल्या. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
“सर्वज्ञानी असलेले संजय राऊत, त्यांची महिलांबद्दल असलेली त्यांची भूमिका, महिलांविषयी असलेली त्यांनी मानसिकता ही संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकरणावर भाष्य करणं न केलेलंच बरं. त्यांचे खायचे आणि दाखावायचे दात वेगळे आहेत. हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. त्यांनी एका महिलेला वाहिलेली शिव्याची लाखोली आजही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी त्यांचं ज्ञान या विषयाततरी पाजळू नये”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
“शीतल म्हात्रेंबरोबर उभं राहणं महिलांचं कर्तव्य”
“राजकारण फार कमी महिला काम करतात. महिलांना राजकारणात येण्यासाठी प्रेरणा देणं हे माझ्यासारख्या महिलेचं कर्तव्य आहे. आज शीतल म्हात्रे या पहिल्यांदा राजकारणात आलेल्या नाहीत. त्यांनी मुंबई महापालिकेतही नगरसेविका म्हणून काम केलं आहे. त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार घोसाळकर यांनी त्यांना कशाप्रकारे त्रास दिला, हे सर्वांनी बघितला आहे. भररॅलीमध्ये असा प्रकार कोणीही करू शकत नाही. मात्र, जे दाखलवं जात आहे, ते चुकीचं आहे. एक महिला म्हणून शीतल म्हात्रे यांच्या बरोबर उभं राहणं सर्व महिलांचं कर्तव्य आहे”, असेही त्या म्हणाल्या.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत शीतल म्हात्रे प्रकणावरून टीका केली होती. “राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे. दादा कोंडके हवे होते. त्यांचा ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा खूप गाजला होता. पण, ‘मुका घ्या मुका’ प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे? त्यांचा संबंध काय? हा सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे.”, असे ते म्हणाले होते.