मुलचेरा:-भारतीय कृषी
अनुसंधान परिषद-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा अंतर्गत मुलचेरा व बोलेपल्ली, जि. गडचिरोली येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक नगराळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र), डॉ. रामकृष्ण जी. आय., वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषी विद्याशाखा), श्री. विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी, श्री. एस. आर. गरमले, मंडळ कृषी अधिकारी, कु. संचयनी कुंभारे, वाय.पी.-१ तसेच बोलेपल्ली, देवडा व परिसरातील आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. दिपक नगराळे यांनी अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा योजनेची उद्दिष्टे व रूपरेषा यावर मार्गदर्शन केले. तसेच कापूस व धान पिकांवरील प्रमुख कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, तसेच बुरशीनाशकांचा शिफारशीनुसार योग्य व सुरक्षित वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. डॉ. रामकृष्ण जी. आय. यांनी कापसाची सघन व कमी अंतराची लागवड, वेळेवर कृषी कामे करण्याचे महत्त्व तसेच पीक वाढ व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कापूस पिकाच्या योग्य व्यवस्थापनासाठी शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. श्री. विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, पीक विमा योजना तसेच गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती उपस्थितांना दिली. या दरम्यान, बोलेपल्ली येथील अंगणवाडी केंद्र परिसरात श्री. पार्वती डी. चांदेकर (मदतनीस) व विद्यार्थ्यांच्या सहभागाने पोषण वाटिका उपक्रमांतर्गत विविध रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पोषण, पर्यावरण संवर्धन व परसबागेचे महत्त्व याबाबत जागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलेपल्ली व देवडा येथील अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना विविध कृषिउपयोगी निविष्ठांचे वितरण करण्यात आले. यामध्ये कापूस वेचणीच्या थैली, विद्राव्य खते, नीम तेल, पीक वाढ नियंत्रक, बुरशीनाशके, कीटकनाशके तसेच कामगंध सापळे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक संरक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन शिफारशीत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी कु. संचयनी कुंभारे (वाय.पी.) यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमावेळी ७० हुन अधिक आदिवासी शेतकऱ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.





