जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांनी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

गडचिरोली, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) तसेच दिव्यांग गुणवंत खेळाडू या प्रवर्गांतील पात्र व्यक्तींनी १० जुलै २०२६ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज बंद लिफाफ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल, गडचिरोली येथे सादर करावेत.
निवड झालेल्या पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी अर्जदारांनी शासनाने निश्चित केलेल्या पात्रता व निकषांची पूर्तता करणे आवश्यक असून, आवश्यक कागदपत्रे व हमीपत्रासह प्रस्ताव सादर करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.





