महाराष्ट्र

पाकिटबंद खाद्यपदार्थांवर स्पष्ट इशारा अनिवार्य! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश; खाद्यपदार्थांच्या पाकिटावर पोषणमूल्यांची माहिती आणि आरोग्यविषयक इशारे देणे बंधनकारक

पाकिटबंद खाद्यपदार्थांवर स्पष्ट इशारा अनिवार्य!

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश; खाद्यपदार्थांच्या पाकिटावर पोषणमूल्यांची माहिती आणि आरोग्यविषयक इशारे देणे बंधनकारक

नवी दिल्ली, दि. २६ नोव्हेंबर : जास्त साखर, मीठ किंवा फॅट (चरबी) असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांवर स्वतंत्र लाल पटकोनी इशारा चिन्हे लावण्याचे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) दिले आहेत. यापुढे ज्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल, त्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगाची इशारा चिन्हे लावणे बंधनकारक राहणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या न्यायासनाने याचिकेवर सुनावणी करताना हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. न्यायालयाने या आदेशाची ६० दिवसांत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

खाद्यपदार्थांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर असलेल्या पोषणविषयक लेबलिंगमध्ये ‘अॅडेड शुगर’ (बाहेरून घातलेली साखर) आणि ‘अॅडेड फॅट’ (बाहेरून घातलेले फॅट) ऐवजी ‘टोटल शुगर्स’ (एकूण साखर) आणि ‘सॅच्युरेटेड फॅट’ (संतृप्त मेद) यांचा समावेश चिंतेचे घटक म्हणून केला जावा.

ग्राहकांना खरेदीपूर्वीच मिळणार स्पष्ट माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, खाद्यपदार्थांच्या पाकिटावर पोषणमूल्यांची माहिती दर्शविणारी स्पष्ट चिन्हे असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांना खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यातील साखर, मीठ आणि चरबीचे प्रमाण सहज समजणार आहे. तसेच आरोग्यदायी आहार निवडण्यास मदत होणार आहे.

प्रत्येक पाकिटाने आकारात संबंधित घटकाचे प्रमाणित चित्र असावे. परिस्थितीनुसार त्यावर ‘हाय फॅट’, ‘हाय शुगर’ किंवा ‘हाय सॉल्ट’ असा मजकूर लिहिलेला असावा.

एफएसएसएआयने ‘डायटरी गाइडलाइन्स फॉर इंडियन्स’ (डीजीआय, २०२४) येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या दीर्घकालीन सहमतीनुसार, मिठाचा घटकही चिंतेचा घटक म्हणून मानावे आणि त्यात मिठाचा समावेश असावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

header