सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन
महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक मांडणार; लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबरला तर राज्यसभेची २ डिसेंबरला
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर : मोदी सरकारने अखेर लोकसभा आणि राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे. लोकसभेची बैठक सोमवार ३० नोव्हेंबरला बोलावण्यात आली असून, राज्यसभेची बैठक २ डिसेंबरला होणार आहे.
लोकसभा आणि राज्यसभेची विशेष बैठक बोलावण्याची औपचारिक विनंती सरकारने दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे केली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी रात्री ‘एक्स’वरून याबाबतची माहिती दिली.
लोकसभा आणि राज्यसभेच्या या विशेष बैठकीची कामकाज पत्रिका सरकारने अद्याप जाहीर केली नसली, तरी महिला आरक्षण तसेच मतदारसंघाच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या या बैठकी बोलावण्यात आल्याचे मानले जात आहे.
लोकसभेत ३० नोव्हेंबरला महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाणार असल्याचे समजते. दोन दिवसांच्या चर्चेनंतर २ डिसेंबरला ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके पारित केली जातील. लोकसभेत पारित झाल्यानंतर ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके २ डिसेंबरला राज्यसभेत मांडली जातील. दोन दिवसांच्या चर्चेनंतर ३ डिसेंबरला राज्यसभेत ही विधेयके पारित केली जाणार आहेत. ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी सरकार संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार, अशी मागील काही वर्षांपासून सुरू असलेली चर्चा यामुळे खरी ठरली आहे.
लोकसभा तसेच राज्य विधानसभांत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबतचे महिला आरक्षण विधेयक आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मतदारसंघ परिसीमनाबाबतच्या घटनादुरुस्ती विधेयकातून लोकसभा तसेच राज्य विधानसभांतील जागा सरसकट ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. लोकसभेत सध्या ५४३ जागा असून, या जागा ८५० करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.
दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता
महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. २०२५ च्या एप्रिल महिन्यात बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात दोन तृतीयांश बहुमताच्या अभावी ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके फेटाळली गेली होती. ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे सरकारजवळ बहुमत असल्याचे मानले जात आहे.
प्रश्नोत्तर, शून्य तास नाही
विशेष म्हणजे काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांचा मतदारसंघाच्या परिसीमनाला विरोध आहे. पुढील २५ वर्षे लोकसभेच्या ५४३ जागा कायम ठेवून त्यातच महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ३० नोव्हेंबरपासून होणारे हे संसदेचे विशेष अधिवेशन असल्यामुळे यात प्रश्नोत्तराचा तास तसेच शून्य तास राहणार नाही.
पावसाळी अधिवेशन संपल्याची अधिसूचना नाही
महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक विशेष अधिवेशनात पारित करता यावे म्हणून सरकारने संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्याची अधिसूचना आतापर्यंत जारी केलेली नव्हती. संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन्ही सभागृहांतील प्रचंड गदारोळामुळे १३ ऑगस्टला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते.
२. काँग्रेसने तातडीने बोलावली बैठक
विशेष अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर : केंद्र सरकारने अत्यावश्यक सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करताच काँग्रेसने रणनीती आखण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी येथे तातडीने बैठक बोलावली आहे. ही बैठक काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित करायच्या मुद्द्यांवर आणि सरकारला कोंडीत पकडण्याच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा करण्यात येईल. बैठकीला काँग्रेसचे खासदार, वरिष्ठ नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पक्षाच्या एका खासदाराने वृत्तसंस्थेला दिली.
संबंधित खासदार आणि नेत्यांना तातडीने दिल्लीत बोलावण्यात आले. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. यानंतर शनिवारी इंडिया आघाडीतील पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली जाणार आहे, तथापि अद्याप त्याची अधिकृत माहिती समोर आली नाही.
या अचानक झालेल्या अधिवेशनामुळे आणि विरोधी पक्षांच्या तात्काळ बैठकीमुळे तीव्र राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.





