
पटसंख्येअभावी शाळा बंद झाल्याने १४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; चार किलोमीटर अंतरावरील शाळेत जाणे धोकादायक असल्याने पालक संतप्त
सिरोंचा | प्रतिनिधी
सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत नडीकुडा केंद्रातील गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मागील वर्षापासून पटसंख्येअभावी शिक्षण विभागाने बंद केल्याने गावातील विद्यार्थ्यांसमोर गंभीर शैक्षणिक संकट निर्माण झाले आहे. शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले असून पालकांमध्ये शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक सत्रापासून शाळा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम तसेच पोचमपल्ली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्रीमती ललिता सल्ला यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी सिरोंचाचे नायब तहसीलदार श्री. एन. हलामी यांची भेट घेतली. यावेळी शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी, गडचिरोली तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात पालकांनी नमूद केले आहे की, सरकार ६ ते १४ वर्षे वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा प्रभावीपणे राबवत आहे. अशा परिस्थितीत केवळ पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून संपूर्ण शाळाच बंद करणे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा आणणारा असून तो अन्यायकारक असल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे.
शाळा बंद झाल्यानंतर येथील विद्यार्थ्यांना रंगधामपेठा येथील शाळेत संलग्न करण्यात आले आहे. मात्र दोन्ही गावांदरम्यान सुमारे चार किलोमीटरचे अंतर असून राष्ट्रीय महामार्गावरून लहान मुलांना दररोज पायी ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या गावातील १४ विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. शाळा बंद झाल्यापासून त्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत असून अनेक विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पालकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, चालू शैक्षणिक सत्रातही शाळा सुरू करण्यात आली नाही, तर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम, माजी सरपंच श्रीमती ललिता सल्ला, रमेश कस्तुरी, शंकर कुमरी, सुरेश दुर्गम, कोंडय्या जोडे, सारय्या नामाला यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.





