प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ; २,३९८ उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश, ज्येष्ठ नागरिकांनाही अतिरिक्त आरोग्य संरक्षण
मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील पात्र कुटुंबांना आरोग्य संरक्षण मिळत असून, विविध आजारांवरील उपचारांसह एकूण २ हजार ३९८ उपचार पद्धती व शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील पाच हजारांहून अधिक अंगीकृत शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना उपचार घेता येतात.
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभ
केंद्र सरकारच्या आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
असे तयार करा आयुष्मान कार्ड
लाभार्थ्यांना अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या आधारे आयुष्मान कार्ड तयार करता येते. यासाठी आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकान किंवा आयुष्मान ॲपच्या माध्यमातून प्रक्रिया करता येते.
नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा
आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने शासनाच्या या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी आपली पात्रता तपासून आयुष्मान कार्ड तयार करून घ्यावे आणि शासनाच्या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :
– महात्मा फुले जन आरोग्य योजना : १५५३८८ / १८००२३३३२२००
– आयुष्मान भारत योजना : १४५५५ / १८००१११५६५





