मुंबई, दि. 30: सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतांना ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री हे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.
तसेच नाटक या कलाक्षेत्रासाठी सतिश पुळेकर, कंठसंगीतासाठी मृदला दाढे-जोशी, उपशास्त्रीय संगीतासाठी मंजूषा पाटील, चित्रपटासाठी सुमित राघवन, कीर्तनासाठी विजय बोधनकर, शाहिरीसाठी शाहीर नंदेश उमप, नृत्यासाठी राजश्री शिर्के, कलादानासाठी जयराज साळगांवकर, वाद्यसंगीतासाठी तौफिक कुरेशी, लोककलासाठी सत्यपाल महाराज चिंचोलकर आणि आदिवासी गिरीजनसाठी डॉ. बाळु धुटे हे नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतील. सदर समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहील.
