
अहेरी : समाधान शिबिर हा केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण करणारे हक्काचे व्यासपीठ आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बचाव होत आहे. अशा उपक्रमांमुळे शासनाचा पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान कारभार थेट जनतेच्या दारी पोहोचत आहे, असे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील भव्य समाधान शिबिराचे आयोजन अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, भामरागडचे उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील, भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे, एटापल्लीचे तहसीलदार निलेश होनमारे, सिरोंचाचे तहसीलदार अजय सकुंदरवार, मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे, गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, बालविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाधान शिबिरात अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांतील महसूल, पंचायत राज, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, आदिवासी विकास, समाजकल्याण, शिक्षण, ग्रामविकास, वन, अन्न व नागरी पुरवठा, रोजगार हमी, महावितरण, जलसंपदा, बँकिंग आदी विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली.यावेळी उत्पन्न, जात, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, नॉन-क्रीमी लेयर यांसारख्या आवश्यक दाखल्यांचे वितरण, शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकारणे, पीक विमा, कृषी योजनांचे मार्गदर्शन, महिला बचतगटांसाठी माहिती, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ, आरोग्यविषयक सेवा, आधार व इतर कागदपत्रांबाबत मार्गदर्शन अशा विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.शेतीचे कामे सुरु असतानाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मान्यवरांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व विभागांच्या स्टॉलना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, दिवसभर ढगाळ वातावरण असूनही कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे जणू निसर्गानेही या लोकाभिमुख उपक्रमाला साथ दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
*शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद*
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांतील लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. अनेक नागरिकांना आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे व योजनांच्या मंजुरीपत्रांचे वितरण,धनादेश वितरण,शेतीचे अवजारे, खत ,बी बियाण्याचा वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला सर्वसामान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





