गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी नोंदणी करावी : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’चा आढावा

गडचिरोली, दि. २२ जुलै (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक (Agristack) प्रणालीवरील नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. पात्रतेनुसार बँकांकडून प्राप्त कर्जमाहिती व शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे लाभ मंजूर केला जाणार आहे.

योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित पीक कर्जधारक पात्र शेतकऱ्यांनाही शासनाच्या निकषांनुसार लाभ मिळू शकतो. तसेच आवश्यकतेनुसार पात्र लाभार्थ्यांना एकरकमी समझोता (OTS) योजनेचाही लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सन २०२३-२४ अथवा २०२४-२५ या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची नियमानुसार पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष परतफेड केलेल्या रकमेच्या आधारे नियमानुसार हा लाभ मंजूर केला जाईल.

कर्जमाफीसंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत राहणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींचे नियमानुसार निवारण करण्यात येईल.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, तहसील कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद मेश्राम यांनी दिली आहे.