ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विधानसभा अर्थसंकल्पात विरोधी पक्षाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली आहे.

भारताच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. 43 टक्के वाटा हा महाराष्ट्र राज्याचा आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने 200 आणि 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल 300 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.