Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बोटीने जलप्रवास करत तहसीलदार पोहोचले पाड्यावर

बोटीने जलप्रवास करत तहसीलदार पोहोचले पाड्यावर

वेंगणुर येथे घेतले मतदार नोंदणी शिबीर

वेंगणुर,सुरगाव आणि गरंजीला भेट

मुलचेरा:भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरक्षण कार्यक्रम,2024 घोषित केलेला आहे.सदर कार्यक्रमांतर्गत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी कार्यक्रम राबविण्यासाठी मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी आपल्या चमुसह चक्क बोटीच्या साहाय्याने जलप्रवास करत तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या वेंगणुर गाव गाठले.

वेंगणुर ग्रामपंचायत अंतर्गत वेंगणुर, सुरगाव,अडंगेपल्ली आदी गावांचा समावेश होतो.हा परिसर अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो.पावसाळ्यात कन्नमवार जलशय तुडुंब भरल्याने या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्वच गावांचा तब्बल 4 ते 5 महिने बाह्य जगाशी संपर्क तुटतो.सध्या हीच परिस्थिती सुरू असून या परिसराला अक्षरशः पाण्याचा वेढा आहे.या भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात येण्यासाठी शासनाने दिलेल्या बोटीच्या आधार घेऊनच बाहेर पडावं लागतो.केवळ कन्नमवार जलशयच नाही तर देवदा येथील नाल्यावर पूल नसल्याने याही ठिकाणी तुडुंब भरलेल्या नाल्यातून जीव मुठीत घेऊन कंबरभर पाण्यातून यावे लागते.पावसाळ्यातील नागरिकांची अडचण लक्षात घेता या परिसरातील नवीन मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी स्वतः आपल्या चमू सोबत वेंगणुर,सुरगाव आणि गरंजी येथे शिबीर घेऊन तब्बल 37 नाव नोंदणी करून घेतले.

यावेळी त्यांनी वेंगणुर,सुरगाव तसेच गरंजी गावाला भेट देऊन येथील नागरिकांशी आस्थेने संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली.नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना तसेच आदी माहिती देऊन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.एवढेच नव्हेतर विविध दाखले आणि योजनांपासून वंचित नागरिकांना कागदपत्र गोळा करून संबंधित तलाठी,मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे मार्गदर्शन केले.एवढेच नव्हेतर एखाद्या कागदपत्र कमी पडत असेल तर गावातील सरपंच,उपसरपंच किंव्हा सुशिक्षत युवकांच्या मोबाईल द्वारे संबंधित कर्मचार्यकडे वॉट्सप करा असेही त्यांनी आवाहन केले.

विशेष म्हणजे पावसाळ्यात या भागात ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.बरेचदा अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात जाण्याचे टाळतात.मात्र,येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी चक्क बोटीचा आधार घेऊन या परिसरातील गावांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली.तेंव्हा सुरगाव येथील नागरिकांना अडंगेपल्ली येथे म्हणजे तब्बल 8 ते 10 किलोमीटर अंतरावर जाऊन रेशन घ्यावे लागते ही बाब समोर येताच त्यांनी सुरगाव साठी स्वतंत्र रेशन किंव्हा जवळच असलेल्या वेंगणुर येथे सोय करून देण्याची ग्वाही दिली.यावेळी सोबत असलेले तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली व नागरिकांचे अडचण जाणून घेतली.

यावेळी मंडळ अधिकारी वाय पी भांडेकर,तलाठी आर जे उसेंडी,महसूल सहाय्यक बापू जल्लेवार,सरपंच नरेश कांदो,मारोती पल्लो, कोतवाल तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.