सिरोंचा :
वैशाली मेकओवर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी यांच्या तृतीय बॅचच्या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात अकॅडमीतून मेकअप व ब्युटी क्षेत्रातील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीच्या संचालिका वैशाली मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार, श्रीजा भंडारी (शिक्षिका) तसेच स्वाती बर्डे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत ब्युटी आणि मेकअप क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी अशा प्रशिक्षण संस्थांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
अकॅडमीच्या संचालिका वैशाली मॅडम यांनी प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विद्यार्थिनी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
“कौशल्यातून स्वावलंबनाकडे” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.





