गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिरोंचा नगरपंचायतीकडून सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन; १५ लाखांच्या खासदार निधीतून साकार होणार ज्ञानमंदिर


सिरोंचा |
सिरोंचा शहरातील नागरिकांना दर्जेदार वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपंचायत सिरोंचा यांच्या पुढाकारातून सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. बुधवार, दि. ०८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. पदमा सतीश भोगे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन, नारळ अर्पण व फित कापून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
ज्ञान, संस्कृती आणि अभ्यासाला चालना देणारे सार्वजनिक वाचनालय हे शहराच्या शैक्षणिक विकासासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हे वाचनालय उपयुक्त ठरणार आहे. शहरात आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे वाचनालय उभारण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीने पुढाकार घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या सोहळ्यास नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री. राजू सिडाम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी नगरसेवक जगदीश रालबंडीवार, सतीश भोगे, सतीश राचर्लावार, रणजित गागापूरवार, नरेश अलोणे, इम्तियाज खान, नगरसेविका पदमा पिल्लीवार, लोकमतचे पत्रकार नागभूषणम चकिनारपुवार, माजी नगरसेवक विजय तोकला, सामाजिक कार्यकर्ते मारोती गणपूरवार, पोचम आकुदारी, इजहार शेख, भगवान पिल्लीवार, नगरपंचायत अभियंता धर्मेंद्र घोडे, कर्मचारी सत्यम डुरके, कंत्राटदार राहुल जिठ्ठाबोईना यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
सदर सार्वजनिक वाचनालयाची इमारत खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत उभारण्यात येणार असून, यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे वाचनालय सिरोंचा–सूर्यरावपल्ली मार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागील नगरपंचायतीच्या जागेवर उभारले जाणार आहे.
या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, विविध विषयांवरील पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भविष्यात डिजिटल वाचन सुविधांचाही समावेश करण्याचा नगरपंचायतीचा मानस असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांची गरज अधोरेखित केली. आजच्या डिजिटल युगातही पुस्तकांमधून ज्ञानार्जनाची परंपरा कायम ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सिरोंचा शहराच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, वाचन संस्कृतीला चालना देणारे हे वाचनालय लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा निर्धार नगरपंचायतीने व्यक्त केला आहे.