
मुलचेरा : मुलचेरा शहरातील दुर्गा मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मोकाट बैल व गायींचा कळप रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हेच बैल दिवसा देखील मुख्य चौकात आणि गजबजलेल्या रस्त्यांवर बसलेले दिसतात. विशेषतः रात्री प्रकाश कमी असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या मोकाट जनावरांचे मालक कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायत,नगरपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





