ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

विश्वनाथनगर परिसरात चिखलात बस फसली प्रशासनाच्या निष्काळजीपणाप्रती तीव्र रोष कायमस्वरूपी उपाययोजना करा


गडचिरोली मुलचेरा: तालुक्यातील कोपरअल्ली–विश्वनाथनगर मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही पडताना दिसून येत आहे.
सोमवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस या मार्गावरील चिखलात रुतल्याने जवळपास ७० विद्यार्थी तब्बल तीन तास रस्त्यातच अडकून राहिले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एमएच-१४ एलएक्स-६५६९ क्रमांकाची मानव विकास मिशनची बस सकाळच्या सुमारास अहेरी येथून लगाममार्गे विद्यार्थ्यांना घेऊन मुलचेराकडे रवाना झाली होती. मात्र, विश्वनाथनगरनंतर कोपरअल्लीजवळील मुख्य रस्त्यावर साचलेल्या चिखलात बस रुतून बसल्याने वाहन पुढे नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उतरावे लागले व मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, या मार्गावर वारंवार वाहने अडकत असताना प्रशासन शांत का? एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच उपाययोजना करणार का? असा संतप्त सवाल विद्यार्थी, पालकांसह स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला.
घटनेची माहिती तत्काळ तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे देण्यात आली. मात्र, इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची यंत्रणा नेमकी कुठे होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास याच ठिकाणी एक ट्रकही चिखलात अडकला होता. सदर ट्रक दोन ट्रॅक्टर आणि गावकऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आला. सलग दोन दिवस एकाच ठिकाणी वाहने अडकत असतानाही संबंधित विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. अनेक गावांतील विद्यार्थी दररोज मुलचेरा येथे शिक्षणासाठी या मार्गाने प्रवास करतात.