निराधार लाभार्थ्यांना जीवन प्रमाणपत्र काढणे बंधनकारक नायब तहसिलदार श्रीमती एस. एन. झाडे यांचे आवाहन

मुलचेरा : संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इतर सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी नियमित अनुदान सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) काढणे बंधनकारक आहे.
तहसिल कार्यालय, मुलचेरा यांच्या वतीने सामाजिक सुरक्षा योजनांमधील लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते. हे अनुदान नियमितपणे मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक आहे.
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट हे शासनाच्या केंद्रातून किंवा अधिकृत मोबाईल प्रणालीद्वारे सहज उपलब्ध करून घेता येते. तालुक्यातील ज्या निराधार लाभार्थ्यांनी अद्याप आपले जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढून संबंधित कार्यालयात नोंद अद्ययावत करून घ्यावी.
लाभार्थ्यांनी वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे अनुदान प्रलंबित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इतर सामाजिक सुरक्षा योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन नायब तहसिलदार श्रीमती एस. एन. झाडे, तहसिल कार्यालय मुलचेरा यांनी केले आहे.





