मुलचेरा :-
महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी मौजा मथुरानगर (ता. मुलचेरा) येथे कृषीदिन कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, जैविक शेती तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी श्री. विकास पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री. एस. आर. गरमळे, उप कृषी अधिकारी श्री. एम. के. दूधबावरे, कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण अधिकारी श्री. नारायण लोलमवाड तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बीज प्रक्रिया व तिचे फायदे, जैविक खते, जैविक कीडनाशके, दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत, जैविक बुरशीनाशके यांचा योग्य वापर, त्यांचे फायदे आणि शेती उत्पादनात होणारी वाढ याबाबत सखोल माहिती देण्यात आली. नैसर्गिक व शाश्वत शेतीचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करतानाच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले.
तसेच शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देत MahaVistar AI या उपयुक्त डिजिटल साधनाचा वापर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर EL Niño परिस्थितीत पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, पाणी व्यवस्थापन, पीक नियोजन आणि जोखीम कमी करण्यासाठी घ्यावयाच्या उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांचीही सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामध्ये PMFME, PM-Kisan, विकसित भारत – VB-G-RAM-G यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, उपलब्ध अनुदान तसेच शेतकऱ्यांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, गावातील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांना विविध प्रश्न विचारून आधुनिक शेती पद्धती, नैसर्गिक शेती आणि शासनाच्या योजनांबाबत शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी श्री. एस. आर. गरमळे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. तिरुपती कौशल्ये यांनी प्रभावीपणे केले, तर सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रोहित कोडापे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कृषीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, हवामान बदलाशी सुसंगत शेती, नैसर्गिक शेतीची तत्त्वे आणि शासनाच्या विविध कृषी योजनांची उपयुक्त माहिती मिळाल्याने कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.





