12:29:40
मुलचेरा : महाराष्ट्र शासनाच्या महा डीबीटी पोर्टलमार्फत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबनाला चालना देणाऱ्या दोन महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्यांवर अनुदान दिले जाते.
या योजनांअंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळे, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी, विद्युत पंप संच, सोलर पंप, पीव्हीसी पाइप, सूक्ष्म सिंचन संच, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, पारसबाग, बैलगाडी/ट्रॅक्टर अवजारे तसेच विशेष विहीर यांसारख्या बाबींवर शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे किमान १ एकर ते कमाल ६ एकर शेती असणे आवश्यक आहे.
या योजनांमुळे शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधा उपलब्ध होऊन पाण्याची बचत, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होते. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करून किंवा जवळच्या अधिकृत ऑनलाइन सेवा केंद्राशी संपर्क साधून या योजनांचा लाभ घ्यावा.





