मुलचेरा : भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी संचलित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, गोमनी (ता. मुलचेरा) येथे नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त शाळेचा पहिला दिवस उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन आणि पारंपरिक पाऊलखुणा घेऊन नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी आणि पालक भारावून गेले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोमनीचे माजी सरपंच शंकर वंगावार होते. पालक अधिकारी म्हणून प्रकल्प कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक आर. आर. कुळमेथे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील पुरुषोत्तम चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन येलमुले, ए. एस. शेंडे, प्रतिष्ठित नागरिक अजय विरमलवार, यशवंत कलसार, सदस्य शकुंतला मरापे, शैलाताई गंगूवार, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांता गरतुलवार, शुभम शेंडे, पालक मनकु कवडो, मुख्याध्यापक आर. एच. दास, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरीचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली.गोमनी येथील आश्रमशाळेतही विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय व्हावे, यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रभातफेरी काढण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांच्या हातात पुष्पगुच्छ देत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. आनंददायी आणि आपुलकीच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद झळकत होता.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. एच. दास यांनी केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एस. बी. कुंदोजवार यांनी, तर आभार प्रदर्शन पी. आर. गांगरेड्डीवार यांनी केले.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्याने झाल्याने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.




