महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार एक लाख रिक्षा! प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा; पाच वर्षांत २०२७ ते २०३१ दरम्यान रिक्षांचे वाटप, १० टक्के अनुदान तर ९० टक्के बँक कर्ज

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार एक लाख रिक्षा! प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा; पाच वर्षांत २०२७ ते २०३१ दरम्यान रिक्षांचे वाटप, १० टक्के अनुदान तर ९० टक्के बँक कर्ज

 

मुंबई, दि. २८ नोव्हेंबर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांत तब्बल एक लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे.

 

या योजनेला ‘अनाथांचा नाथ… दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ असे नाव देण्यात आले आहे. २०२७ ते २०३१ या कालावधीत ही योजना राबविण्याचे नियोजन असून, दरवर्षी २० हजार शेतकरी कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

१० टक्के अनुदान, ९० टक्के बँक कर्ज

 

या योजनेंतर्गत रिक्षाच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळामार्फत अनुदान म्हणून दिली जाणार आहे. उर्वरित ९० टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँका, अनुसूचित बँका किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

३०८ हून अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांना लाभ

 

राज्यातील ३०८ हून अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड नियोजित उद्दिष्टानुसार करण्यात येईल.

 

९ फेब्रुवारी २०२७ रोजी रिक्षांच्या चाव्या देणार

 

योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांना ९ फेब्रुवारी २०२७ रोजी रिक्षांच्या चाव्या सुपूर्द करण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

 

संगणकीय सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड

 

योजनेसाठी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाकडून जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जांची व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड संगणकीय सोडतीद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांकडे पाठविण्यात येतील.

 

शेतकरी कुटुंबांना स्वयंरोजगाराची संधी

 

अवकाळी पाऊस, दुष्काळ, पिकांचे नुकसान, उत्पादन खर्चात वाढ आणि शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळणे अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

 

दरम्यान, योजनेची सविस्तर पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत अर्ज सुरू होण्याची तारीख याबाबत परिवहन विभागाकडून पुढील सूचना प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत शासन निर्णय व सूचनांची प्रतीक्षा करावी.

header