अभियांत्रिकी प्रवेशाच्या केंद्रीभूत प्रक्रियेच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर राज्यातील तब्बल १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, अद्याप ५० हजार ८४१ जागा रिक्त असून या जागांसाठी संस्थात्मक फेरी सुरू झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाची संधी अद्यापही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. संस्थात्मक तसेच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाची प्रक्रिया १४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्यात यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी २ लाख ४५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यातील ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १११ शाखा उपलब्ध असून, व्यवस्थापन कोट्यासह एकूण २ लाख १८ हजार ९७६ जागा आहेत. त्यापैकी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत २ लाख ३ हजार २९३ जागा उपलब्ध होत्या. चार फेऱ्यांअखेर त्यापैकी ७४.९९ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत
५० हजारांहून अधिक जागा रिक्त
केंद्रीभूत प्रवेशाच्या चार फेऱ्या संपल्यानंतर आता संस्थात्मक फेरीला सुरुवात झाली आहे. कॅपमधून शिल्लक राहिलेल्या ५० हजार ८४१ जागांवर संस्थात्मक फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यात १५ हजार ६८३ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे कॅपच्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या किंवा अपेक्षित शाखा न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरी महत्त्वाची ठरणार आहे.
अभियांत्रिकीच्या १११ शाखांमध्ये यंदाही विद्यार्थ्यांचा कल संगणकाधारित अभ्यासक्रमांकडे असल्याचे प्रवेशाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. चार फेऱ्यांअखेर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सर्वाधिक २३ हजार २३० प्रवेश झाले असल्याचे दिसते.राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या चार केंद्रीभूत फेऱ्यांअखेर १ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असले, तरी अजूनही ५०,८४१ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा आणि व्यवस्थापन कोट्यातील १५,६८३ जागांसाठी संस्थात्मक फेरी सुरू झाली असून १४ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.





