विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता ‘बी.कॉम’ आणि ‘एमसीए’ हे पदवी अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेची कोणतीही मर्यादा नसून कितीही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. ऑनलाइन प्रॉक्टर पद्धतीने परीक्षा होणार असून १०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर मार्गदर्शन करणार आहे.
दोन वर्षे तयारी
या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठामार्फत दोन वर्षे तयारी सुरू होती. अभ्यासक्रमाच्या क्रेडिटनुसार त्याचे व्हिडीओ तयार करण्यात आले असून, एका क्रेडिटसाठी १५० व्हिडीओ असणार आहेत. प्रत्येक व्हिडीओ ७ ते १० मिनिटांचा असून, ते विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एक व्हिडीओ अभ्यासल्यानंतर त्यावर प्रश्नावली येणार आहे. ती प्रश्नावली भरून, त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील व्हिडीओ विद्यार्थ्याला अभ्यासता येणार आहे. तसेच १०० विद्यार्थ्यांमागे १ मेंटॉर असणार आहे. व्हॉट्सॲप ग्रुप व ई-मेद्वारे या मेंटॉरमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ऑनलाइन प्रॉक्टर बेस्ड् पद्धतीने या अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाणार आहे.





