सिरोंचा: तालुक्यातील गंभीर वीज समस्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) वरिष्ठ अधिकारी अखेर मैदानावर उतरले आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता गजीबीये, अधीक्षक अभियंता खंडिलकर व कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी आज थेट सिरोंचा तालुक्याचा दौरा करत येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी वीज प्रश्नांचा पाढा वाचत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
१३२ केव्ही उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करा
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या १३२ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाला तातडीने गती देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी नगरसेवक रंजित गागापुरवार, नगरसेवक इम्तियाज खान, सामाजिक कार्यकर्ते सिद्धिक भाई, सुजल कमलवार, संदीप घंटा व सुजित मदरबोईना यांनी लावून धरली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास तालुक्यातील विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कमी दाबाच्या विजेमुळे शेतकरी व ग्राहक संकटात
तालुक्यातील अनेक भागांत सध्या कमी दाबाचा (लो-व्होल्टेज) वीजपुरवठा होत आहे. याचा सर्वाधिक फटका घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना बसत आहे. कमी दाबामुळे शेतातील कृषिपंप चालवणे अशक्य झाले असून शेतीची कामे ठप्प पडली आहेत. वीजपुरवठा सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
स्मार्ट मीटरच्या सक्तीला तीव्र विरोध
यावेळी झालेल्या बैठकीत स्मार्ट मीटरचा मुद्दाही चांगलाच गाजला. नागरिकांवर कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी स्पष्ट भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. ग्राहकांच्या मनात या मीटरबाबत अनेक शंका आणि अडचणी आहेत. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन आणि त्यांच्या तक्रारींचा निवारण करूनच यावर निर्णय घ्यावा, असे अधिकाऱ्यांना बजावण्यात आले.
अधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तांत्रिक बिघाड आणि पायाभूत सुविधांचा अभाव या सर्व समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने ऐकून घेतल्या. यावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि समाधानकारक झाली असून, तालुक्यातील वीज प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी माहिती नगरसेवक रंजित गागापुरवार यांनी दिली.




